Me too च्या वादळानंतर आता नेपोटिझम अर्थात घराणेशाहीला पाठिंबा ....हा वाद सध्या सर्व देशभरात चर्चिला जाऊ लागला आहे. आणि तेही आताच घडलेल्या व सर्व सामान्य माणसाच काळीज पिळवटून टाकणाऱ्या सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यू मुळे ह वादळ उठलं आहे.
कोणत्याही सोशल मिडियाच्या पोस्ट वर पहा सोळा हजार, व लाखाच्या वरती कमेंट करून लोकांनी आपल्या मनात धगधगणारा तीव्र विरोध व्यक्त केला आहे.
सुशांत मध्यमवर्गीय कुटुंबाच प्रतिनिधित्व करत होता. अतिशय मेहनती . व देशात इंजिनिअरिंग प्रवेश परिक्षेत सातव्या क्रमांकावर आलेला कमालीचा हुशार मुलगा.
परंतु तमाम जनतेला अस वाटतं आहे की, तो नेपोटिझमचा शिकार झाला आहे. अर्थात नेपोटिझम म्हणजे काय ...तर घराणेशाहीला पाठिंबा.
जे लोक त्याला ओळखत ही नव्हते किंवा त्याच्या फिल्म पाहिल्या नव्हत्या . त्या लोकांना ही दोन दिवस झोप लागली नसेल . इतकी लोक त्याला स्वत: शी रिलेट करत आहेत.
प्रत्येक आईबापाला त्याच्या मध्ये आपला मुलगा दिसला व कुठेतरी जीवाचा थरकाप उडाला. का ??? तर आपल्या मुलांनी मेहनत करून ही...... सगळं काही मिळवून ही, जर असच पाऊल उचललं तर ?तर काय करायचं? कुठल्या सरकारकडे न्याय मागायचा. आणि मग लोक त्याच्या मृत्यू कोणी केला ह्या पेक्षा तो कशामुळे घडून आला . ह्या कारणाच्या मुळापर्यंत शोध घेत निघाली. आता खर तर ह्या मधून खूप गोष्टी समोर आल्या.
पण होत काय...जर तुमचे आई-वडील स्टार असतील तर तुमच्यावर दादागिरी दाखवण्याच कोणी धाडस करत नाही.
. म्हणजे वडील प्राचार्य असले की मुलाला सगळ्यात ए ग्रेड मिळते तसा काहीसा प्रकार.....
त्याचबरोबर बाॅलीवुड मधे कशाप्रकारे नेपोटिझमला पाठिंबा दिला जातो. किंवा कोण कोण पाठिंबा करत हे स्वच्छ व साफ दिसून आलं . पण वाईट ह्या गोष्टीच वाटतं. हे सगळं लोकांसमोर येण्यासाठी एका अत्यंत कष्टाळू मुलाचा जीव जाण गरजेच होत का? त्याला इतकी दुय्यम दर्जाची वागणूक दिली कारण त्याला कोणी आगापिछा नव्हता म्हणून.
म्हणजे सर्व सामान्य लोकांनी आरे ला कारे करायचं नाही. आणि तसं जर केलं तर तुम्ही त्याचे सगळे चित्रपट काढून घेणार? त्याला वाळीत टाकणार ? हीच आमच्या भारतात लोकशाही आहे. आणि ह्याचाच आम्ही अभिमान बाळगतो.
श्रीमंतांच्या मुलांना ते ही विशेषकरून घराणेशाहीतील गर्भ श्रीमंत वातावरणात वाढणाऱ्या मुलांना कशाला करावी लागते आत्महत्या ?
आपल्या कडे आपण जनतेने काही समीकरणे खूप सोप्पी करून ठेवली आहेत. पण कुणासाठी ? घराणेशाहीतून पुढे येणाऱ्या मुलांसाठी . त्यांना आपण सहज स्विकारतो कारण, आपल्या पुढे काही पर्यायच नसतो स्विकारण्याशिवाय.
फिल्म इंडस्ट्रीत व राजकीय क्षेत्रात नेपोटिझम आहे व ते ही खुलेआम हे सर्वश्रुत आहे. अभिनेत्याच्या मुलान अभिनेताच झाल पाहिजे . त्याने इतर कोणत्याही फालतू कलेमध्ये करिअर करण म्हणजे आईबाबाच्या लोकप्रियतेची आयती मिळालेली सीट सोडून देण. फक्त अभिनेता होऊनच लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवता येत हे कुणीतरी बाॅलीवूड मधील महामुर्खाना समजावून सांगितलं पाहिजे. त्याला अभिनयाचा ध किंवा म पण येत नसला तरी लोकांच्या माथी तो दगड "हाच तुमचा हिरो "....म्हणून मारायचं . आणि त्याचा तो झिंगलेला अभिनय चांगल्या कथेची कशी वाट लावून देतो ते महागड तिकीट काढून आपण थियटर मधे बघून यायचं.
हेच गणित राजकारणात . आई किंवा बाबा थकला की मुलगा पक्षाची पताका घालून आणि हात जोडून भव्य दिव्य बॅनर चौकाचौकात लावून रातोरात मुलगा नेता म्हणून तयार होतो. प्रश्र्न एवढाच असतो. की..... लोकप्रियता वाया का घालवायची ???
एकेका घरात सगळं घराणच्या घराण हिरो हिरॉईन यांचं.
तसंच एकेका घरात आमदार, खासदार , मंत्री, महापौर, नगरसेवक सगळे एकाच घरात.
सर्व सामान्यांनी प्रचार करायला सोबत जा.
सच्चे निष्ठावंत राजकारणात मुरलेले कार्यकर्ते यांनी काय करायच????तर निवडून येणाऱ्या साहेबांसाठी
गावोगावी फिरायचं . निवडून आणण्याची जबाबदारी पुर्णपणे आपल्या खांद्यावर उचलायची. मोबदल्यात काय गाडीत पाहिजे तेवढं पेट्रोल आणि ... जेवायला दम बिर्याणी आणि रात्री इंग्लिश.
झाले कार्यकर्ते खुश !!
पुढाऱ्यांच्या मुलांना स्ट्रगल नाही , कसले ते कष्ट माहित नसतात. की कुठल्या जीवघेण्या स्पर्धेशी सामना करावा लागतो. प्रत्येकाच आपापल्या मतदार संघात स्वत:च काॅलेज . मग रांगेत ताटकळण ह्यांना कसं माहित असणार ???
कुणा सुपरस्टाच्या किंवा राजकीय नेत्यांच्यां मुलांनी सुसाईड केलेल आठवतंय .आत्महत्या केल्याची उदाहरणे खूप नगण्य.
त्यांच्या साठी करियर म्हणजे फक्त टाईमपास.
आता सामान्यांसाठी जगण्याची धडपड. मध्यम वर्गीय कुटूंबातील मुलं जीवघेणा प्रवास करून शाळा काॅलेजात जातो. खडतर वाटचालीतून शिक्षण घेतो. आणि नंतर मिळेल ती नोकरी करतो .
त्यांना पण वाटतं आपणही राजकारणात जावं...एक सर्वसामान्यांचा नेता बनून. पण हे साध्या माणसासाठी निव्वळ स्वप्न आहे. कारण, पार्टी तिकीट देते पण कुणाला... पहिल्या उमेदवाराच्या मुलाला,, सुनेला किंवा मुलिला...
राजकारण हे ऐऱ्या गैऱ्यांसाठी नाहीच मुळी!?
महाराष्ट्र टाइम्स मध्ये तरुणांचा आवाज मधे मुलांनी स्पष्ट आपली मत व्यक्त केली आहेत . कि,राजकारणात जावंस वाटतं पण घराणेशाही आडवी येते.
नेपोटिझम मुळे क्वचित फायदा ही होतो. कधी चांगल्या आईबाबाचे गुण मुलांमध्ये ही येतात. मग ते सिने सृष्टीत असुदे किंवा राजकीय. पण तसच्या तसं अनुभवी व्यक्तीमत्व तुम्हाला मिळेलच हे सांगता येत नाही. समोर पाच चांगल्या अनुभवी व्यक्ती असताना आमच्या माथी मात्र घराणेशाहीचा नारळ निवडणुकीत फोडला जातो.
त्यांना सवलती मिळत राहतात. श्रीमंत आणखी श्रीमंत होतो आणि गरीब आणखीन गरीब.
मात्र सामान्य कुटुंबातील मुलांना आज एक सरकारी नोकरी मिळवायची असेल तर, गेट सारख्या महा भयंकर अग्निदिव्य परिक्षा पार पाडावी लागते. साधं इंजिनिअरिंगला प्रवेश मिळविण्यासाठी सीईटी,, जे ई मेन्स सारख्या प्रवेश परीक्षा देऊन एका मार्क ने चांगला प्रवेश हुकतो. तेव्हा काय करायचं सामान्य कुटुंबातील मुलांनी.
सर्वच क्षेत्रात जर घराणेशाही फोफावली , आपला गळा दाबू लागली तर उद्या सर्व सामान्य माणसाला मोकळेपणाने श्वास घेण ही दुर्लभ होऊन जाईल.
नियम कडक आहेत पण कोणासाठी?? सर्वसामान्यांसाठी...बाॅलिवुडकरांची मुलं अमाप पैसा ओतून परदेशात शिक्षण घेऊन येतात. नेत्याची मुलं त्यांच्याच शाळा काॅलेजात शिकतात . आणि सामान्य मुलं एका एका मार्क साठी रात्रभर घोकंपट्टी करतात. का तर चांगल काॅलेज हातातून जावू नये म्हणून.
आई-वडील मुलांना सांगतात ..
...तुझा बाबा मुख्यमंत्री नाही .... आपल्या ला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. मन लावून अभ्यास कर.
सिनेसृष्टीत व राजकारणात वयाच बंधन नाही . चालायला येत नसल तरी पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर माणूस बसू शकतो.
मी म्हणते , नियम तिथेही लावा . एकदा एक निवडणूक लढवली की पुन्हा तो उमेदवार भविष्यात कोणतीच निवडणूक लढवू शकणार नाही. असा करा नियम . नाहीतर मग अस करा वडीलांना किंवा आईला सरकारी नोकरी असेल तर त्यांच्या रिटायरमेंट नंतर अपत्याला पन्नास टक्के ती सरकारी नोकरी मिळण्याचे चान्स मिळवून द्या.
जर कायदे बनवणाऱ्यांनाच सगळी सूट आहे तर मग गोरगरीब जनतेला अशा हक्कांपासून का वंचित ठेवता.
अभिनेता घोषित करण्यासाठी एक... सरकार मान्य कायदा अमलात आणा ....जो अभिनेता म्हणून परिक्षा देईल त्यामध्ये पब्लिक ओटींगचाही समावेश करावा ... जेणेकरून पार्सलिटी खूप कमी प्रमाणात होईल. व करिअर करायला येणाऱ्या सर्व सामान्य मुलांना न्याय मिळेल. ्
. राजकीय उमेदवार ज्या मतदार संघातून निवडणूक लढवणार आहे. त्या भुभागाचा सर्व राजकीय, भौगोलिक, आध्यात्मिक , ऐतिहासिक प्रश्नांवर आधारित written /oral परिक्षा घ्याव्यात . त्यामुळे जनतेला ही कळून येईल की आपण ज्या उमेदवाराला निवडून देत आहोत त्या व्यक्तीला आपल्या परिसराचा कितपत अभ्यास आहे.
आज जे उमेदवार किंवा अभिनेता नेपोटिझमचा धिक्कार करत आहेत.त्यांनी सर्वा समक्ष शपथ घ्यावी की मी देखील घराणेशाही पुढे चालवणार नाही. व सर्वसामान्य व्यक्तीला भविष्यात संधी देईन.
नियम खूप करता येतात. किंवा भविष्यात ती गरज आहे . पण सर्वसामान्य माणसाच कबंरड महागाईने तर मोडलच आहे. पण ह्या नियमांनी जास्त वाकल आहे.
जरा ह्या लोकांना कडक नियमांना सामोर जावं लागेल तेव्हा समाजातील खरे प्रश्न ह्यांना व ह्यांच्या मुलांना समजतील . तेव्हा प्रत्येक मतदाराची किंमत कळेल. अभिनेत्यांच्या मुलांनाही समजेल की ह्या क्षेत्रात खूप मेहनत असते . परिश्रम करावे लागतात . तेव्हा लोकांच्या ह्रदयात एक अतूट स्थान निर्माण करता येतं.
स्वलिखित लेख
©® सुजाता पाटील
अणुशक्ती नगर मुंबई