कल्याण /लोकनिर्माण प्रतिनिधी (सौ .राजश्री फुलपगार)
एक नगर होतं. तिथं एक शेतकरी होता, त्याच्या शेतांत एक नागाचं वारूळ होतं. श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपला नित्याप्रमाणं नांगर घेऊन शेतांत गेला. नांगरतां नांगरतां काय झालं?
वारूळांत जीं नागांची नागकुळां होतीं, त्यांना नांगराचा फाळ लागला. लौकरच तीं मेलीं.
कांहीं वेळानं नागीण आली, आपलं वारूळ पाहूं लागली, तो तिथं वारूळ नाहीं आणि पिलंही नाहींत. इकडे तिकडे पाहूं लागली, तेव्हां नांगर रक्तानं भरलेला दिसला. तसं तिच्या मनांत आलं, ह्याच्या नांगरानं माझीं पिलं मेलीं. तो रोष मनांत ठेवला. शेतकर्याचा निर्वंश करावा असं मनांत आणलं. फोफावतच शेतकर्याच्या घरी गेली. मुलांबाळांना, लेकीसुनांना, शेतकर्याला व त्याच्या बायकोला दंश केला. त्याबरोबर सर्वजणं मरून पडली.
पुढं तिला असं समजलं कीं, ह्यांची एक मुलगी परगांवीं आहे, तिला जाऊन दंशा करावा म्हणून निघाली. ज्या गांवी मुलगीं दिली होती त्या ठिकाणी आली, तों त्या घरीं बाईनं पाटावर नागनागीण, नऊ नागकुळं काढलीं आहेत, त्यांची पूजा केली आहे, दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाणे, लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. मोठ्या आनंदानं पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनांत आनंदानं लोळली. इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे.
इतक्यांत नागीण उभी राहिली. तिला म्हणूं लागली, “बाई बाई तूं कोण आहेत? तुझी आईबापं कुठं आहेत?” इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले. पाहाते तों प्रत्यक्ष नागीण दृष्टीस पडली. बाई बिचारी भिऊं लागली. नागीण म्हणाली. ” भिऊं नको, घाबरूं नको, विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे.” तिनं आपली सर्व हकीकत सांगितली, ती ऐकून नागिणीला फार वाईट वाटलं. ती मनांत म्हणाली, ‘ही आपल्याला इतक्या भक्तीनें पुजते आहे, आपलं मत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनांत आणलं आहेम हें चांगलं नाहीं.” असं म्हणून सांगितली, तिनं ती ऐकली, वाईट वाटलं. तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला.
तिनं तिला अमृत दिलं, ते घेऊन त्याच पावलीं ती माहेरीं आली. सगळ्या माणसांच्या तोंडांत अमूत घातलं. सगळीं माणसं जिवंत झालीं. सगळ्यांना आनंद झाला.
बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हां बापानं विचारलं, ” हें व्रत कसं करावं?” मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटीं सांगितलं कीं, ” इतकं कांहीं झालं नाहीं तर निदान इतकं तरी पाळावं. नागपंचमीचे दिवशी जमीन खणूं नये. भाज्या चिरूं नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊं नये. नागोबाला नमस्कार करावा.” असं सांगितलं, तेव्हापासून तो नागपंचमी पाळूं लागला.
जशी नागीण तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो!
तात्पर्य : किती दुष्ट प्राणी असला आणि त्याची जर आपण मनोभावे चांगली आराधना केली, तर तो संतुष्ट झाल्यावाचून रहाणार नाही.