मुंबई/लोकनिर्माण (शांत्ताराम गुडेकर)
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह राज्यातील विविध ठिकाणाहून नागरिक मुंबई, ठाणे, पुणे अशा विविध शहराच्या ठिकाणी स्थलांतरीत होत आहेत.यापुर्वीही झाले आहेत. मात्र शहराकडील हे स्थलांतर वेळीच थांबणे शहराच्या आणि ग्रामीण भागाच्या दृष्टीने योग्य ठरणार आहे.यासाठी कोकणातील तरुणांनी आपल्या गावाकडे लक्ष देऊन आधुनिक शेतीकडे लक्ष दयायला हवे.विविध जोडधंदे करुन स्वःतासह कुटूंबाचा विकास साधायला हवा.
कोकणात छोटी-मोठी गांव, वाड्या आहेत.परंतु अशा ठिकाणी केवळ वयोवृद्ध आजी-आजोबा व क्वचित तरुणवर्ग दिसतो. बहुसंख्य घरे ही कुलूपबंद आहेत.तर शेती ओसाड पडली आहे. साहजिकच रोजगार नसल्याने तरुणवर्ग हा छोटी- मोठी नोकरी करण्यासाठी शहराकडे वळत आहे. गणेशोत्सव, होळी, दसरा, जत्रा असे पारंपारिक सण आले तरच हा तरुणवर्ग गावाकडे हजेरी लावतो. एरवी सगळीकडे शांतताच-शांतता पसरलेली असते. हे सर्व भयानक आहे, काही वर्षांत ही गावे स्मशानागत बनायला वेळ लागणार नाही.म्हणून कोकणातील तरुण-तरुणी यांनी खेड्यापाड्यातच राहून करण्या योग्य स्वंयरोजगार करुन समृद्ध कोकण बनविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
गावे, गावातील शाळा बंद होत आहेत.हे सर्व का घडतंय? कारण रोजगार नाही,शेती आहे पण चांगले पीक नाही.वर्षभर पुरेल इतके उत्पन्न नाही, मुलांना चांगले शिक्षण नाही, वैद्यकीय उपचार पुरेसे नाही, असे बरेच प्रश्न नागरिकांच्या मनात भेडसावत आहेत. किंबहुना या भागामध्ये शेती करायला कोणी तयार होत नाही, शेती करावी तर मुबलक पाण्याचा साठा नाही, शेतीविषयक मार्गदर्शक नाही, शेती करण्यास शासनाकडून कोणतीच मदत नाही, मजूर मिळत नाही, शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहेत, रोजगार नसल्याने बेरोजगारी वाढली आहे, असे अनेक प्रश्न पदरात पडलेली आहेत. त्यामुळे ना-इलाजाने स्थानिक नागरिकांना शहराची वाट धरावी लागत आहे.पण भविष्यात असेच होत राहिले तर गाव ओस पडतील.चांगल्याप्रकारे उत्पन्न मिळत नाही म्हणून भुमिपुत्र आपली शेती, जागा कवडीमोल किंमतीत विकून मोकळे होतील. पण याचा फायदा परप्रातियांना होईल.सर्वांत धक्कादायक म्हणजे भुमिपुत्र आज परप्रांतीयांना आपल्या जमिनी विकत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.त्यातून बाहेरून आलेले लोंढे स्वतःचे व्यवसाय टाकून घर करून बसले आहेत. सरकार कोणाचेही असो, कायम या ठिकाणी दुर्लक्ष झालेला आहे. आतापर्यंत जे झालं ते झालं; पण या पुढे सर्व प्रश्नाची दखल घेऊन काळजीने लक्ष दिले पाहिजे. जेवढ्याही शासकीय योजना असतील त्या लोकांसमोर आणून लोकांपर्यंत खेड्या-पाड्यात पोहचवाव्यात. रुग्णालयात सुविधा देणे यावर विशेष भर दिले पाहिजे. विशेषतः खेड्यांमध्ये वैद्यकीय उपकेंद्रे जी वाळवी खात बसलेली आहेत, ती पुन्हा चालू करावी, शैक्षणिकदृष्ट्या बळकट करणे गरजेचे आहे. छोटे-मोठे उद्योग आणले पाहिजे, जेणेकरून स्थानिक नागरिकांना रोजगार मिळेल, पर्यटन स्थळ यांचा विकास करणे गरजेचे आहे, पर्यटकांची वाढलेली गर्दी ही स्थानिक लोकांना रोजगार मिळू शकतो."तुज आहे तुझ्या पाशी पण वेड्या तु जागा चुकलाशी" या प्रमाणेच कोकण भुमिपुत्रचे झाले आहे. कोकणातील प्रत्येक जिल्ह्यातील,तालुक्यामधील गावा-गावात, वाडी-वाडीपर्यंत नागरिकांना भेडसावणार्या प्रश्नांवर सरकारने, सर्व राजकीय पक्षांनी राजकारण बाजूला ठेऊन, येथील जनतेच्या हितासाठी एकत्रित येऊन, या सर्व अडचणी दूर करणे काळाची गरज आहे.वेळ न दडवता आतापासूनच अंमलबजावणीला सुरुवात व्हायला पाहिजे.नाही तर उदया उशिर झालेला असेल. अशी परिस्थिती निर्माण झाली तरच शहराकडे जाणारे नागरिक थांबतील व छोटी-मोठी गावे, वाड्या हे सर्व ठिकतील, अन्यथा पुढील येणारा काळ खूप कठीण असेल हे सांगायला कोण्या जोतिष्याची गरज नाही.तेव्हा कोकणातील तरुणांनो जागे व्हा...आपल्या जमिनी न विकता विकसित करा.आपली मानसिकता बदलून योग्य मार्गदर्शन घ्या.स्वंयरोजगारचे हजारो प्रकल्प उभे कसे करता येतील व स्थानिकांना रोजगार कसे उपलब्ध होतील याकडे लक्ष दया.प्रकल्प उभारणीसाठी योग्य प्रशिक्षण घ्या.निर्माण होणाऱ्या अनेक अडचणी संघटीतपणे सोडण्यासाठी एकत्र या.हापूस आंबा, कृषी उत्पादने,पर्यटन,फलोद्यान,इ.संघटीत मार्केटिंग करा.त्यासाठी व्यावसायिक संघटना निर्माण करा.पुढील १५-२० वर्षांत कोकण जागतिक दर्जाचे आर्थिक विकासाचे केंद्र कसे करता येईल यासाठी प्रमाणिक प्रयत्न करा.कोकणाता नद्या,निसर्ग,धबधबे,सह्याद्रीच्या पर्वतरांगा,विविध तीर्थक्षेत्र असल्याने पर्यटकांना आकर्षित करणे होते आहे. त्यासाठी विशेष प्रयत्न करा.मत्स्योद्योग,शेती,पर्यटन,फलोद्यान इ.क्षेत्रात कोकण जागतिक स्तरावर जाणे सोपे आहे.गरज आहे ती तुमच्या प्रमाणिक प्रयत्नांची.तुम्ही कोकण भुमिपुत्र आहात...भुमिपुत्र राहा...नाही तर उदया आपल्याला आपल्याच गावात...वाडीत पाहुणे व्हावे लागेल.तेव्हा तरुण-तरुणींनो पुन्हा खेड्याकडे चला...आधुनिक शेती,व्यवसाय,स्वंयरोजगार करा.आपले कोकण समृद्ध करा.