लॉकडाऊन च्या दरम्यान मुलांवरील व स्त्रियांवरील अत्याचारांच्हया प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, दुसऱ्या आठवड्यापासूनच मुलांवरील अत्याचारांच्या बातम्या आपल्याला ऐकायला येऊ लागले आहेत. या अत्याचाराचे बळी मुले व मुली दोघेही आहेत परंतु मुलींचे प्रमाण जास्त आहे. ह्या अत्याचाराचा एक भयानक प्रकार म्हणजे बालविवाह होय याच्या भीषण स्वरूपाची जाणीव अगदी सुरुवातीपासूनच तत्कालीन समाजसुधारकांना होती. भारतात १९२९ मधेच बालविवाह कायदा करण्यात आला या कायद्याला ‘सारडा कायदा’ असे बोली भाषेमध्ये ओळखले जाते. ‘बालविवाह प्रतिबंधक कायद्या’ मध्ये बाल विवाहाला शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली. ‘बाल’ या शब्दाची व्याख्या या कायद्यामध्ये करण्यात आली. या व्याख्येमध्ये दुरुस्ती करून झाल्यामुळे बाल म्हणजे- २१ वर्षे वयाचा मुलगा आणि १८ वर्षांची मुलगी यापेक्षा कमी वय असलेली व्यक्ती असे ठरले.भारतात १८ वर्षाखालील महिलेचा व २१ वर्षाखालील पुरुषाचा विवाह म्हणजे बालविवाह होय. बालविवाह विषयक १९२९ मधील कायदा रद्द करून बालविवाह प्रतिबंध कायदा पारित करण्यात आला. हा कायदा ११ जानेवारी २००७ रोजी लागू झाला. त्यानुसार पूर्वी असलेल्या शिक्षेसंदर्भात पुनर्विचार करून, बालविवाह करणार्या पुरुषाला २ वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा एक लाखापर्यंतचा दंड देण्यात येईल, अशी तरतूद केली. भारतात बालविवाह हा गुन्हा असून जाणीवपूर्वक बालविवाहास प्रोत्साहन देणाऱ्याला, असा सोहळा ठरविणाऱ्या व्यक्तीला, बालकाशी विवाह करणाऱ्या सज्ञान व्यक्तीला या कायद्यानुसार शिक्षा होऊ शकते. पोक्सो कायद्यानुसार १८ वर्षांखालील मुलीशी लैंगिक संबंध ठेवणे, हा गुन्हा निश्चित करण्यात आला आहे. बालविवाहा विरोधात असे भक्कम कायद्याचे कवच आहेच, तरीही ते रोखण्यात म्हणावे तितके यश आलेले नाही. अद्यापही भारतासारख्या देशात बालविवाह होत आहेत खरंच ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. बालविवाहाचे प्रमाण जास्त असलेल्या भारतातील ७० जिल्ह्यांपैकी १७ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. मराठवाड्यात ही स्थिती चिंताजनक आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या ४ विवाहांपैकी एक बालविवाह असतो. म्हणजेच, ४ वधुंपैकी एकीचे लग्न तिची १८ वर्षे पूर्ण होण्याआधीच झालेले असते. तर ५ पैकी ४ विवाहित मुली, विशी गाठण्याआधीच माता झालेल्या असतात.
ग्रामीण भागात सर्वसाधारण बालविवाहाचे कारणे लक्षात घेतले तर असे समोर येते की, काही ठिकाणी रूढी-परंपरा, कुठे गरिबी, कुठे असुरक्षितता, गैरसमज तर काही ठिकाणी मुलीचे अतिचंचल स्वभाव असे कारणे समोर येतात. ग्रामीण भागात जिथे मुलांना शिक्षणासाठी गावातच शाळाही नाही अशा मुलींना तालुक्याच्या ठिकाणी शाळेत पाठविणे व अशा मुलींना एकटे दुकटे सोडल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची चिंता पालकांना भेडसावत असते. लैंगिक शिक्षणाचा अभाव आणि अनपेक्षित गर्भधारणा या गोष्टींची भीती आणि अशा सगळ्या परिस्थितीत जर एखादी मुलगी अशा लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरली तर त्यामुळे त्या अशा मुलींना लग्नासाठी अनुचित समजले जाते आणि ह्या सगळ्या प्रकारांच्या बळी आपल्या मुली ठरू नये असे पालकांना वाटत असते आणि त्यामुळेच ते आपल्या किशोरवयीन मुलींच्या लग्नाची घाई करत असतात. त्याचप्रमाणे आपल्या समाजातील काही रूढी प्रथा नुसार ह्या सामाजिक बंधनांमध्ये पालक अडकले जातात मुलींच्या उशिरा लग्न केले तर लग्नासाठी वर मिळणार नाही व खूप मोठ्या प्रमाणात हुंडा देऊन लग्न लावून द्यावे लागेल अशी भीती त्यांच्या ठिकाणी असते. काही वस्त्यांमध्ये मोलमजुरी करणारे पालकांना आपले बारा-तेरा वर्षाच्या वयात आलेल्या मुलींना घरी एकटा ठेवण ही सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे तिचे लग्न करून दिले की जबाबदारीतून मुक्त झालो ही भावना आजही पालकांच्या मनात घर करून आहे. त्यातूनच मग बालविवाहाकडे पालकांचा कल असतो. केवळ लग्नात कमी खर्च होईल व हुंडा द्यावा लागणार नाही म्हणून कमीत कमी खर्चामध्ये आपल्या पेक्षा दुप्पट वयाच्या माणसाशी मुलींचे लग्न लावून मुलींना त्यांच्या मनाविरुद्ध बोहल्यावर चढवले जाते.
बाल विवाह याचा परिणाम मुला मुली दोघांवरही होतो परंतु हे मुलींमध्ये हे अधिक आहे बाल वधू-वरांवर ह्या विवाहाचा व्यापक आणि दीर्घकालीन परिणाम होतो. बालविवाह मुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या प्रचंड आहेत बालविवाहामुळे अपरिपक्व वयात येणारे लग्नाचे बंधन त्यातून होणारी मानसिक-शारीरिक कुचंबणा, हुंड्यासह सासरच्यांचा छळ, अकाली लादले जाणारे मातृत्व, ॲनिमिया गर्भाशयाच्या संबंधित आजार, शारीरिक कार्यक्षमता, लैंगिक संबंधांचे संबंधातून होणारे संसर्ग या आजारांना तोंड देत संसाराचा गाडा रेटणे कठीण होते. त्यामुळे बाळंतपणातच होणारे मृत्यू, प्रचंड रक्तस्त्राव, कुपोषित आणि कमी वजनाच्या बालकांचा जन्म अशा अनेक गंभीर आरोग्याच्या समस्या बालविवाहामुळे निर्माण होत असतात. अनेकदा अशा विवाहातून मुलींची नकळतपणे विक्री होऊन त्यांना शरीरविक्रीच्या व्यवसायात ढकलले जाते व आयुष्यभर त्यांचे शोषण होते. बालविवाह आज इतके प्रश्न घेऊन उभा आहे मात्र, तरीही या प्रश्नाचे गांभीर्य समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलेले नाही.
अनेक ठिकाणी असे विवाह हे लपून-छपून केले जातात. आणि आता तर लॉकडाऊन मुळे सगळ्यांना आयती संधी चालून आलेली आहे आणि या संधीचा फायदा घेणारे गल्लोगल्ली भेटतील कमी लोकांना बोलावून थोडक्यात समारंभ ह्या गोष्टीमुळे पालक आपल्या मुलींचे पटापट लग्न लावून देण्याच्या मागे लागले आहेत. लॉकडाऊन मुळे आलेली आर्थिक मंदी आणि शाळा बंद असल्यामुळे पण कदचित हे निर्णय घेतले जात असणार. हे डिजिटल युग असल्यामुळे गावोगावी खेडोपाडी सर्वत्र मोबाईल फोन आणि इंटरनेट पोहोचलेली आहे. ज्या गावांमध्ये किमान सुरक्षिततेचे साधने उपलब्ध नसले तरी मोबाइल फोन मात्र बहुतांशी लोकांकडे मिळतील. आणि ह्याच मोबाईल फोन मुळे आपल्याला आज भारतातील कानाकोपऱ्यातील तसेच विदेश देश-विदेशातील घडामोडी ची आपल्याला माहिती आहे परंतु आपल्या आजूबाजूला होणाऱ्या बालविवाहाच्या घटनांपासून मात्र आपण अलिप्त आहोत. मुलांच्या विकासाची, संरक्षणाची जबाबदारी फक्त कुटुंबाची व शासनाची नाही तर पूर्ण समाजाची आहे. समाज म्हणून आपली जबाबदारी आहे की आपले वागणे हे मुलांच्या हिताला धरून असले पाहिजे. कुठलीही अनिष्ठ गोष्ट मुलांच्या बाबतीत घडत असेल तर आपण ते थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे तर आणि तरच आपण बालविवाह रोखू शकतो. गावातच शिक्षणाची पुरेशी यंत्रणा उपलब्ध झाली तर हा प्रश्न सोडवायला मोठे बळ मिळणार आहे. गाव पातळीवर संरक्षण समितीची स्थापना होणे आवश्यक असून पोलिसांनी संरक्षक म्हणून प्रामाणिकपणे कामकाज पाहणे आवश्यक आहे. मुलांच्या हक्काच्या बाबतीत आपण जागृत व्हायला हवे यातूनच आपण उज्वल भविष्याकडे जाऊ शकतो. पालकांना व समाजातील लोक ज्यांना याचे दुष्परिणाम माहिती नाही त्यांना ते आपण पटवून दिले पाहिजे त्याच प्रमाणे सुशिक्षित मंडळींनी ह्याविषयीची कायदे व कायद्यातील तरतुदी त्यांना समजावून सांगितल्या पाहिजे. जोपर्यंत बालविवाहाचे दुष्परिणाम व त्याचे भीषण स्वरूप याविषयी जनजागृती केली जाणार नाही तोपर्यँत कदाचित बालविवाह थांबणार नाही.
अॅड. सुनीता खंडाळे साळसिंगीकर
09833000121