कल्याण /लोकनिर्माण (सौ राजश्री फुलपगार)
कोणीतरी म्हटलं आहे. आयुष्यात तीन कप्पे असावे.पहिला कप्पा कामाचा दुसरा कुटुंबाचा आणि तिसरा स्वतःचा....पहिला कामाचा कप्पा म्हणजे ३७ वर्षे नोकरी केली. रोजची घरातील घाई-गडबड, ट्रेनचा जीवघेणा प्रवास, अॉफीसवर्क या कामाच्या कप्प्यात करियर, बंगला, गाडी, पैसा सारं काही मिळवलं ....दुसरा कुटुंबाचा कप्पा. आई-वडिल,सासू-सासरे,पती मुलं , नातेवाईक,मित्र-मैत्रीणी सारं-सारं सांभाळल....या लॉकडाऊन मध्ये मी माझा मात्र स्वतःचा तिसरा कप्पा उघडला.
मी फेब्रुवारी मध्ये निवृत्त झाले आणि लॉकडाऊन चालू झाले.निवृत्त झाल्यानंतर ठरवले होते गावाला जावू,नातेवाईकांना भेटू,मैत्रीणीं बरोबर सहलीला जावू,मला निसर्गाची खूप आवड तेव्हा निसर्ग सौंदर्याचा आता शांतपणे आस्वाद घेऊ.परंतु सर्वच प्लान रद्द झाले. नेहमीच रुटिन ही एकदम बंद झाले.मी खूपच अस्वस्थ झाले.सुरूवातीला मला बंदिस्त झाल्यासारखे झाले.पण मी मनाला,स्वतःला सावरले.आजपर्यत आयुष्यातील सर्व परिक्षा पास झाले.ही पण आपली एक परिक्षा आहे आणि या परिक्षेला आपण हसत-हसत सामोरे जायचे असा मनाशी ठाम निश्चय केला.आणि मग काय मी माझा दैनंदिन कार्यक्रम लिहिण्यास सुरवात केली.
...सकाळी-सकाळी मोबाईल वरच्या अलार्मची तुतारी वाजली.डोळे उघडून प्रथम देवाचे दर्शन घ्यायचे.मग गॕलरीचा दरवाजा उघडायचा.आकाश,झाडे,पक्षी,सुर्यदेवाचे दर्शन घेऊन निसर्गाची प्रार्थना करावयाची.हा तर माझा रोजचाच दिनक्रम होता.त्यामुळे आता या लॉकडाऊन मध्ये ही काही बदल नाही.
एकीकडे दूध तापत ठेवायचे.आणि एकीकडे चहा ठेवायचा.हातात झाडू घेऊन केर काढायला सुरुवात करायची.मोलकरीण सुद्धा लॉकडाऊन मध्ये तिच्या घरी अडकलेली. घर मोठं असल्यामुळे आणि सवय नसल्यामुळे (रिटायर होवून २० च दिवस झाले होते )पूर्ण घर झाडून होईपर्यंत कबंर पार वाकून गेलेली असे त्या कंबरला ताठ होण्यासाठी किचनच्या ओट्या जवळ ताठ उभे राहून कणिक मळून घ्यायची.दूधाचा गॕस बंद करायचा,चहा गाळून घ्यायचा.अर्धा कप चहा घेऊन थोडा मोबाईल हाताळायचा.कुणाचे Good morning स्विकारायचे तर कुणाला सुप्रभात पाठवायचे.नजर मोबाईलवर असली तरी कान मात्र आजूबाजूच्या आवाजाचा कानोसा घेण्यासाठी सज्ज असत.मातोश्री साहेब ( सासूबाई)उठल्याची चूळबूळ लागली कि हातातील खेळण( मातोश्रीच्या भाषेत) बाजूला ठेवून हातात लाटण घ्यायचे.पोळ्या करायला सुरवात.कारण त्यांना बरोबर त्यांच्या वेळेवर गरम चहा,नरम चपाती तूप लावून टेबलावर हजर पाहिजे .माझ्या पोळ्या त्यांचा नाष्टा झाला कि मातोश्री सांगतील ती भाजी काढून ठेवायची.त्या जसा आदेश देतील त्या-त्या आदेशाप्रमाणे भाजी बनवायची.त्यात मग कसलीही कसूर नाही.
राजे ची उठायची वेळ झाली कि ते उठणार तरीही थोडावेळ टि.व्हि.समोर लोळणारच.मातोश्रींनी राजे ना आदेश दिला कि बाहेरून काही महत्त्वाचे सामान आणावयाचे आहे कि मग राजे ताबडतोब तयारीला लागणार.
अंगावर कपडे, तोंडाला मुंडासे, एका हातात ढाली सारखी कापडी पिशवी हालवत(पोलिसांना दिसेल अशी) दुसऱ्या हातात सामानाची यादी.रणांगणावर जावे तसे जय्यत तयारीत ते बाहेर पडत. यादीतील सर्व सामान मिळाले की जणू युद्ध जिकंल्याच्याआवेशात ते घरात प्रवेश करत.जिकूंन आल्यानंतर जसे आपण आरती घेऊन जातो तसे सॕनिटायझर घेऊन त्यांना सामोरे जायचं. आणलेल्या सामानाची धूऊन पूसून फ्रिज,डबे यात विभागणी करुन ठेवायची.
आता बाळराजे उठलेले असत.मग त्यांच्या फर्माईश प्रमाणे पदार्थ बनवण्याची तयारी.स्वयपाक खोलीतील सर्व कामे आटोपून मग फरशी पुसुन घ्यायची.स्वच्छ स्नान करायचे.
देवपूजा करुन देवाचे स्तोत्र बोलून जपमाळ करुन.नेहमी प्रमाणेच देवाला प्रार्थना करायची.कोरोना वायरस नष्ट कर या जगाला सुखी कर हि तर आता बसता उठतानाची नित्य प्रार्थना झाली आहे.
दुपारचे जेवण आटोपून.भांडी-कपडे करुन मग जरा मोकळा श्वास घेऊन निवांत बसायचे.सकाळपासून दुरावलेला मोबाईल हातात घ्यायचा.आतापर्यंत दुपारचे तीन वाजलेले आसत.अर्धा-एक तास वामकुक्षी करायची.आराम झाला की ५ ते ६ मात्र आवडीचे वाचन किंवा घरातील कामे करताना दिवसभरात डोक्यात आलेल्या कल्पना त्या लिहून काढायच्या.
पुन्हा स्वयंपाकाच्या दालनात प्रवेश करुन तिसऱ्या अंकाला सुरवात .चहाची तयारी.रात्रीच्या भोजनाची तयारी. सात वाजता देवाला दिवाबत्ती .मध्ये-मध्ये काही डबे-डुबे चेक करणे.डब्यात चहापावडर-साखर-डाळी भरुन ठेवणे तोपर्यत ८ वाजलेले.आठच्या नंतर मात्र एक-दोन मैत्रीणीं बरोबर फोनवर गप्पा किंवा नातेवाईकांना फोन करुन त्यांच्या खुशालीची चौकशी करायची.तेव्हढेच मन हलके होवून जाते.
रात्री ९ किंवा साडेनऊला जेवून भांडी स्वच्छ करुन.किचन ओटा साफ करुन. थोडावेळ टि.व्ही पाहायचा. घरातील मंडळी बरोबर गप्पा -चर्चा करायच्या.तोपर्यंत निद्रादेवीचे आगमन झालेले.
रात्री पुन्हा मोबाईलवरुन सर्वाचे मॕसेज वाचत कोणाला शुभरात्रीचे संदेश देत उद्या काय करावयाचे याचा विचार करत.परमेश्वराला नमस्कार करत झोपेच्या अधिन व्हायचे.
अशा या लॉकडाऊन च्या दिनक्रमात मी माझा तिसरा कप्पा उघडला.कविता माझी जीव की प्राण तिला मी वाहून घेतलं.धावपळीच्या आयुष्यात माझ्या सर्व इच्छा मी वेळे अभावी पूर्ण करु शकत नव्हते.परंतु आता घरातील सर्वाचे आवडीचे पदार्थ बनवून त्यांना खूष करुन दुपारच्या फावल्या वेळात मी माझे सर्व आवडीचे छंद जोपासायचे असे मनाशी पक्के ठरवले.
अॉनलाईन काव्य वाचन चालू केले.लहान मुलांसाठी माझ्या बालकविता पाठवून मुलांना त्यांचे व्हिडीयो पाठविण्यास सांगितले.या कार्यक्रमाचा हेतू म्हणजे मुलांना कवितेची आवड निर्माण होणे.वाचन,पाठांतरला प्रोत्साहन मिळणे.या कार्यक्रमाला भरपूर लहान मुलांचा प्रतिसाद मिळाला.
अनेक वेग-वेगळ्या कल्पनांचे महिलांकरिता ही व्हिडीयो बनवले.त्यात अनेक मैत्रीणींनी उत्साहाने भाग घेतला.
एक दिवस अचानक मला एक मॕसेज आला.चित्रपट अभिनेत्री सुप्रसिद्ध नृत्यागंना दिपाली भोसले सय्यद हिने तिच्या वाढदिवसा निमित्त online नृत्य स्पर्धा ठेवली.अंतिम तारीख १० मे होती.आणि १० मे ला मला message मिळाला.खूप वर्षाची माझी नृत्य (लावणी) करण्याची इच्छा जागृत झाली .कदाचित तिसऱ्या कप्प्यातील ही सुप्त इच्छा असावी.खरं तर मी खूप थकले होते.पण म्हणतात ना हौसेला मोल नाही. ज्याला आवड आहे तो सवड काढतोच. मग काय
युट्युबवर लावणीचे व्हिडीयो बघून दुपारी सर्व वामकुक्षी घेत असताना मी डान्सची प्रॕक्टिस सुरु केली.थोडा फार सराव झाल्यानंतर मी माझ्या मुलाची लावणीनृत्य च्या व्हिडीयो साठी मदत घेतली.अंतिम तारखेला शेवटच्या क्षणाला video send केला. १२ मे ला निकाल होता.मला काहीच कल्पना नव्हती.मी फक्त माझ्या हौशीखातर video पाठवला होता.एकूण १२०० स्पर्धक होते.
खरंच मला आश्चर्याचा धक्काच बसला.
दिपाली मॕडम ने माझे नाव घेऊन अप्रतिम नृत्य केले असा जेव्हा उल्लेख केला तेव्हा खरंच मी भारावून गेले.
इतकेच नाही तर दिपाली मॕडम नी माझे कौतुक करुन मला पैठणी जाहीर केली तेव्हा तर मी परमेश्वराला अंतःकरणाने मनपूर्वक हात जोडले. मला माझ्या मेहनतीचे फळ मिळाले. घरातील मंडळीना ही नवल वाटले.
कोरोनाच्या कालावधीत जिवाची पर्वा न करता जे अहोरात्र झटत होते ते म्हणजे डॉक्टर,नर्स,पोलिस,सफाई कामगार यांना सर्वांना मानाचा मुजरा. मला ही पहिल्या पासून समाजसेवा करण्याची खूप आवड.अॉफिस मध्ये ही मी सर्वांना मदत करत राहसयची.माझी एक मैत्रीण सामाजिक कार्यकर्ती तिच्या सौजन्याने मला आयुर्वेदीय गोळ्यां मिळाल्या.
"आर्सेनिक अल्बम 30" रोगप्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठी मग मी घरोघरी या गोळ्यांचे वाटप केले. बँकेतील अधिकारी,कर्मचारी,सफाई कामगार,भाजीवाले यांनाही गोळ्यांचे वाटप करुन मार्गदर्शन केले.
गोर-गरीबांना खिचडी वाटप केले.मध्ये एकदा आम्ही सर्व महिलांनी पैसे काढून बुंदीचे लाडू वाटले तेव्हा त्या गोर-गरीब मजदूरांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्या सारखा होता.
अनेक संस्थांना आर्थिक सहाय्य केले.
या लाॕकडाउन मध्ये माझ्या हातून जेव्हढी सामाजिक सेवा करता येईल तेव्हढी करत होते आणि या पुढे ही करणार आहे.
या सर्व सामाजिक कार्याच्या आशिर्वादानेच मला "ठाणे अरुणोदय" यांनी "कोरोना योद्धा" म्हणून मला सन्मानपत्र देऊन सन्मानित केले.
खरंच या लॉकडाऊन काळात सुरवातीला मला वेळ कसा जाईल म्हणून उदास वाटत होते.मी खूप अस्वस्थ होते परंतु मला माझा तिसरा कप्पा सापडला.आणि तिसऱ्या कप्पानेच मला सकारात्मक दृष्टिकोन दाखवून एक प्रकारचे बळ दिले आणि सर्व गोष्टींवर मात करुन हसत-हसत जगायला शिकवले.
जो पर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत आपणही एकदा तरी उघडून बघा **तिसरा कप्पा**
खात्री आहे नक्कीच काही सापडेल.
©️...लेखिकाः-सुरेखा गावंडे
कल्याण- (पूर्व )