मुंबई /लोकनिर्माण (उमेश घोले)
देशात आणि राज्यात सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या दैनंदिन व्यवहारांवर अनेक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. याचा फटका राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनाही बसत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या आयोजनाबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता शिवसेनेचा दसरा मेळावा होणार हे निश्चित झाले आहे. शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी या संदर्भातील माहिती दिली.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी दसरा मेळाव्याबाबत सांगितले की, शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. मात्र सध्या कोरोनाचे सावट असल्याने अनेक नियमांचे पालन करावे लागत आहे. त्यामुळे शिवाजी पार्क येथे दसरा मेळाव्याचे आयोजन करता येणार नाही. मात्र या सोहळ्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. त्यामुळे दसरा मेळावा आयोजित होईल. पण आम्ही नियम पाळतो. स्वतः मुख्यमंत्रीही नियमांचे पालन करत आहेत. त्यामुळे दसरा मेळाव्याचे आयोजन नियमांचे पालन करून शिवाजी पार्कजवळ असलेल्या सावरकर स्मारक येथील सभागृहात होईल.