दसरा सण मोठा,नाही आनंदाला तोटा असे म्हणण्याची परंपरा सुरू झाली ते उगाच नाही. विजयादशमी म्हणजेच अश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जातो.याच दिवसाला दसरा असेही म्हटले जाते.देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीची नवरात्र साजरी होते.आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते.विजय प्राप्त करणारा फार मोठा इतिहास या दिवसाच्या मागे दडलेला आहे.या दिवशी पांडव अज्ञातवास संपवून घरी आले अशी आख्यायिका आढळुन येते.प्रभू रामचंद्रांनी रावणासारख्या बलाढ्य योध्याचा वध करून शत्रूवर विजय प्राप्त केला तो याच दिवशी! देवी दुर्गे ने महिषासुर राक्षसाला युद्ध करून संपविले ते याच दिवशी.आणि त्यामुळेच तिला महिषासुरमर्दिनी असे म्हटले जाऊ लागले.या आख्यायीकांचा इतिहास पाठीमागे असल्याने बरेच राजपूत आणि मराठा योद्धे आपल्या युद्ध मोहीमांचा आजच्याच दिवशी शुभारंभ करत असत.साडेतीन मुहूर्तापैकी एक असा दिवस कोणत्याही कार्याचा शुभारंभ करण्याकरता अत्यंत शुभ समजला जातो.
प्रभू रामचंद्र रावणावर स्वारी करायला निघाले.पांडव अज्ञातवासात राहण्या करता ज्यावेळी विराटच्या घरी गेले त्यावेळीं त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती.अज्ञातवास संपल्यावर त्यांनी तेथील वस्त्रे परत घेतली व त्या झाडाची पूजा केली तो हाच दिवस होता.म्हणून दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केली जाते.शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला.पेशवाईत सुद्धा या सणाचे महत्व मोठे होते.विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते.दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे.लोक या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचे व शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायचे. योद्ध्यांनी शस्त्र पूजन व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थांनी सरस्वती पूजन करायचे अशी प्रथा आहे.
मुले पाटीवर सरस्वतीचे प्रतीकारात्मक चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात.प्रारंभी हा एक कृषीविषयक लोकोत्सव होता.पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई.त्यावेळी शेतकरी हा उत्सव साजरा करीत असत.ग्रामीण भागात शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धतही प्रचलित आहे.महाराष्ट्रात कातकरी,आदिवासी स्त्रिया यादिवशी नाच करतात याला दसरा नृत्य असे म्हणतात.तसेच पंजाब मध्ये दसऱ्याच्या दिवशी रावणदहन करतात. घराला आंब्याच्या पानांचे व झेंडूंच्या फुलांचे तोरण लावतात.
"साधुसंत येती घरा,तोची दिवाळी दसरा"* या संत तुकाराम महाराजांच्या दोन उक्तीत दोन सणांचा अजोड असा उल्लेख केला आहे. व तो योग्यच आहे. विजयादशमी या दिवशी ज्या वृक्षाची पाने लुटली जातात त्या वृक्षाला अश्मतंक असे म्हणतात.ही पाने पित्त व कफ यावर गुणकारी आहेत.
पराक्रमांचा आनंद देण्याघेण्याचा व परस्परात प्रेम वाढवण्याचा हा एक दिवस व सुंदर असा सण म्हणजेच दसरा.
✍️ कु.रुणाली राजेंद्र पांचाळ.
जोगेश्वरी (पूर्व).
मुंबई