मुलुंड /लोकनिर्माण (विशाल मोरे )
मुलुंड परिसरातील रामगड रहिवाशी संघ नं १(रजि )चे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री बळीराम शिवराम सावंत यांनी कोरोना काळात खरोखरच कौतुकास्पद कार्य केले आहे. कोरोनाच्या महामारीत गरजूंना अत्यावश्यक सेवांची स्वखर्चाने मदत करुन अनेकांना आधार देण्याचे पवित्र कार्य सावंत यांनी केले आहे.
कोरोना काळात गरजूंना रेशन वाटप,झोपडपट्टीमध्ये सतत रोगजंतू फवारणी,गरजूंना दवाखान्यापासून औषधोपचारापर्यंत सहकार्य याशिवाय सार्वजनिक शौचालयामध्ये नेहमी ब्लिचिंग पावडर,स्वच्छतेसाठी लागणारे इतर लिक्विड, शौचालयात लाईट व्यवस्था तसेच नाल्यावर सार्वजनिक रहदारीच्या ठिकाणी लाईट फोकस यांसारखे लोकोपयोगी कामे त्यांनी केली आहेत. एखाद्या लोकप्रतिनिधीला लाजवेल अशी कामे सावंत करत आहेत. सावंत यांचे स्थानिक लोकप्रतिनिधींशी देखील चांगले सबंध आहेत.
एकीकडे जगामध्ये कोरोना विषाणूंनी थैमान घातलेले असून अशावेळी कोरोनाग्रस्त रुग्णांची ढाल बनून डॉक्टर, पोलीस, परिचारिका,सफाई कर्मचारी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या सोबत खांद्याला खांदा देऊन सावंत यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आपल्या परीने लोकोपयोगी सेवा बजावत आहेत.
बळीराम सावंत हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, देवगड तालुका मु.पो.नाडण,वीरवाडीचे रहिवाशी आहेत. रामगड रहिवाशी संघ मुलुंड येथे ते १९८१ पासून वास्तव्यास आहेत. नेहमीच सामाजिक क्षेत्राची आवड असणारे सावंत हे प्रसिद्धीपासून कायम दूर राहिले आहेत. त्यांच्या या कौतुकास्पद कार्याबद्दल त्यांना ' स्वराजाचे शिलेदार प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य ' संस्थेकडून *"कोरोना योद्धा*" सन्मान देखील नुकताच प्राप्त झाला आहे.
सावंत यांना सहकार्य करणारे त्यांचे सहकारी कृष्णा चव्हाण, सचिन शिंदे, रमेश उतेकर, तानाजी रिंगे यांच्या आदर्शवत सामाजिक कार्याचे कौतुक मुलुंड परिसरात सर्वत्र होत आहे.