खेड-लोटे/लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम कासकर याच्या तालुक्यातील लोटे येथील मालमत्तेचा लिलाव घाणेखुंट येथील रविंद्र काते यांनी १ कोटी १० लाखांची बोली लावून जिंकला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे झालेल्या या लिलाव प्रक्रियेत दिल्ली येथील वकील भुपेंद्रकुमार भारद्वाज आणि खेड तालुक्यातील घाणेघुट येथील रविंद्र काते यांनी सहभाग नोंदविला होता.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या सात वेगवेगळ्या मालमत्तांचा केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाकडून लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार दाऊद याच्या मुळगावी म्हणजेच मुंबके येथे असलेल्या बंगल्यचा लिलाव १० नोव्हेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे करण्यात आला होता. मात्र लोटे येथे असलेल्या १५०, १५१, १५२, १५३ व १५५ या क्रमांकाच्या भूखंडाचा लिलाव काही कारणास्तव करण्यात आला नव्हता. या भुखंडाची राखीव किंमत ६१ लाख ४८ हजार १०० रुपये निश्चित करण्यात आली होती.
१० नोव्हेंबर रोजी न झालेल्या लोटे येथील मालमत्तेचा लिलाव व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारेच करण्यात आला. या प्रक्रियेत दिल्ली येथील अॅडव्होकेट भुपेंद्रकुमार भारद्वाज आणि खेड तालुक्यातील घाणेखुंट गावचे रहिवाशी रविंद्र काते या दोघांनीच बोली लावली. काते यांनी या भुखंडासाठी १ कोटी १० लाखांची बोली लावल्यानंतर त्यांना विजयी घोषीत करण्यात आले.
दाऊद याचा त्याचा मुळगाव असलेल्या मुंबके येथील बंगल्याचा लिलाव १० नोव्हेंबर रोजी झाला होता. दिल्ली येथील वकिल अजय श्रीवास्तव यांनी या बंगल्यासाठी ११ लाख २० हजारांची बोली लावून घेतला होता.