राजापुरात पदविधर मतदार नोंदणीला अल्प प्रतिसाद - मतदान नोंदणीबाबत जनजागृती करावी – सौ. दीपाली पंडीत

 

राजापूर /लोकनिर्माण (सुनील जठार ) 

 पदविधर मतदार नोंदणीसह मतदार यादी पुर्ननिरीक्षण कार्यक्रमाबाबत राजकिय पक्षांचे पदाधिकारी व पत्रकारांनी अधिकाधिक जागृती करावी असे आवाहन निवासी नायब तहसीलदार तथा निवडणूक नायब तहसीलदार सौ. दीपाली पंडीत यांनी केले आहे. पदविधर नोंदणी मोहिमेला राजापुरात कमी प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत केवळ ७६ पदविधर मतदारांनी नोंदणी केल्याचे सौ. पंडीत यांनी सांगितले. यासाठी आता ६ नोव्हेंबर ही अंतिम तारीख असून याबाबत जास्तीत जास्त जागृती करून पदविधर मतदारांची नोंदणी करावी असे आवाहनही त्यांनी केले.

पदविधर मतदार नोंदणी कार्यक्रम व नियमित मतदार यादी पुर्ननिरीक्षण कार्यक्रमाची माहीती देण्यासाठी शुक्रवारी राजापूर तहसीलदार कार्यालयात सर्व राजकिय पक्षांचे पदाधिकारी व पत्रकार यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

पदविधर मतदार नोंदणीची अंतिम तारीख ६ नोव्हेंबर असून जास्तीत जास्त पदविधर मतदारांनी नोंदणी करावी असे आवाहन सौ. पंडीत यांनी केले. तर याबाबत राजकिय पक्षांनी देखील अधिक जागृती करावी असेही त्यांनी सांगितले.

मतदार यादी पुर्ननिरीक्षण कार्यक्रमांतार्गत आता २७ ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द होणार असून याबाबत काही हरकती, तक्रारी व सुचना असतील तर त्या ३० नोव्हेंबर पर्यंत नोंदवायच्या असून त्याबाबतही दक्षता घ्यावी असेही त्यांनी नमुद केले. राजापुर तालुक्यातील २०० मतदान केंद्रावर आजपर्यंत असलेल्या एकूण मतदारांची संख्या ही १ लाख २६ हजार ९९६ इतकी असून यामध्ये ६८ हजार ५०८ महिला व ६० हजार ४८८ पुरूष मतदारांचा समावेश आहे. तर २० सैनिक मतदार असून ७०४ दिव्यांग मतदार असल्याचे सौ. पंडीत यांनी सांगितले.

या बैठकीला भाजपाच्या जिल्हा कार्यकारणी सदस्या सौ. शीतल पटेल, महिला आघाडीच्या प्रमुख सौ. सुयोगा जठार, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अरवींद लांजेकर, उबाठाचे तालुका प्रमुख कमलाकर कदम, प्रकाश कुवळेकर, काँग्रेसचे ओबीसी तालुका प्रमुख संतोष कुळये, मनसेचे तालुका प्रमुख पंकज पंगेरकर आदी उपस्थित होते.