आमच्या सहनशीलेचा अंत पाहू नका; अन्यथा राज्यात नाथपंथीयांचे नवे भगवे वादळ पहायला मिळेल: प्रशांत पवार

 


हिंगोली / लोकनिर्माण ( बाबुराव ढोकणे)

पालमुक्त समाज, १९६१ च्या पुराव्याची अट रद्द यासह नाथपंथी समाजाचा सामाजिक, आर्थिक विकास व्हावा यासाठी शासनाने तात्काळ गुरू गोरक्षनाथ आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी अन्यथा राज्यात नवे भगवे वादळ नाथपंथीयांच्यारूपात पहायला मिळेल. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असा इशाराच नाथपंथी संघर्ष समितीचे राज्याचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी २७ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिला आहे.



दि. २९ नोव्हेंबर रोजी हिंगोलीत निघणाऱ्या नाथपंथी समाजाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी हिंगोली येथे नाथपंथी समाजाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी महिला आघाडीच्या नेत्या कामाक्षी सोने, जोगीबाबा विश्वंभर महाराज, ह.भ.प. ज्ञानेश महाराज यांच्यासह जितेंद्र इंगळे, गणपत जाधव, दशरथ पवार, राहुल शिंदे, ब्रह्मदेव घोगरे, गणेश शिंदे, संतोष कासार, प्रमिला शंखपाळ, सरस्वती जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पवार पुढे म्हणाले की, नाथपंथी समाज हा शासनदरबारी गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला समाज आहे. सतत भटकंती करणारा समाज म्हणून या समाजाची ओळख आहे. भटक्या प्रवर्गात हा समाज येत असला तरी शासन स्तरावरून ज्या पद्धतीने या समाजाचा विकास होणे गरजेचे होते. तसे कोणतेही प्रयत्न अथवा शासनाने अशाप्रकारच्या कोणत्याही योजना प्रभावीपणे राबविल्या नाहीत. म्हणूनच हा समाज सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास राहिला आहे.

राज्यात अडिच टक्के आरक्षण या समाजाला दिले गेले आहे. मात्र या आरक्षणाचा फायदा या समाजाला किती होतो हा विषय संशोधनाचा आहे. अडिच टक्क्यांमध्ये ३८ जातींचा समावेश करण्यात आला आहे तर दुसरीकडे राजकीय दबावापोटी काही जातींची एन.टी व प्रवर्गात घुसखोरीदेखील झाली आहे. गेल्या १५-२० वर्षांत ज्या जातींचा एनटी व वर्गात समावेश करण्यात आला त्या प्रवर्गाचे मागासलेपण कोणत्या निकषावर ठरवण्यात आले असा प्रश्नदेखील प्रशांत पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

नाथपंथी समाज हा शैक्षणिकदृष्ट्यादेखील मागास आहे. या समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावरून नव्या योजना या समाजासाठी राबविल्या जाव्यात, या समाजाची भटकंती थांबावी यासाठी रोजागारची संधी उपलब्ध करून द्यावी त्याचबरोबर जातीचे दाखले मिळविताना १९६१ च्या पुराव्याची अट घालण्यात आली आहे. ती अट तात्काळ रद्द करावी अशा विविध मागण्यांसाठी नाथपंथी समाज रस्त्यावर उतरला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. दि. २९ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली असा नाथपंथी समाजाचा मोर्चा निघणार असून हा मोर्चा सनदशीरमार्गाने शांततेत पार पडेल. या मोर्चामध्ये हिंगोलीसह नजीकच्या जिल्ह्यातील नाथ बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनदेखील संघर्ष समितीच्यावतीने प्रशांत पवार यांनी केले आहे.