चिपळूण/लोकनिर्माण (संतोष शिंदे )
चिपळूण तालुक्यात विनापरवाना जंगलतोड होत असून पर्यावरणाची हानी होत आहे. गावा गावात अशी वने नेस्तनाबूत करण्यासाठी पैशाच्या हव्यासापोटी बरेच लाकुडतोड करणारे व्यापारी गावात येऊन लाकूड तोड करून साग, खैर(साड), आंबा, फणस अशी उपयोगी झाडे नेस्तनाबूत करुन व्यवहार करताना दिसत आहेत. अशी झाडे तोडून जंगलं नष्ट होत आहेत. आज बेकार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी वनखात्याने विशेष लक्ष दिले पाहिजे.
अशीच घटना सती येथे वनखात्याच्या दक्षतेमुळे दि.२५/११/२०२३ रोजी सायंकाळी ५:४५ च्या सुमारास वनक्षेत्रपाल चिपळूण यांना मिळालेल्या माहितीनुसार परिक्षेत्र वनाधिकारी चिपळूण, वनपाल चिपळूण, वनरक्षक कोळकेवाडी यांनी मौजे ओवळी, ता. चिपळूण येथील ओवळी फाटा येथे जाऊन पिकअप क्रमांक - MH.०८.W.९३९३ ची तपासणी करून गाडी मधे असणारा विनापासी असलेला खैर (साड) लाकूड माल व गाडीमधील लोखंडी वजनकाटा व वजन मापे ताब्यात घेऊन जप्त केली. वनरक्षक कोळकेवाडी यांचेकडील अपराधाचे पहिले प्रतिवृत्त क्रमांक ०८/२०२३ दि.२५/११/२०२३ नुसार वाहन चालक यतीराज तुकाराम होडे व दिलीप बाब्या पवार रा.ओवळी यांचे विरुद्ध भारतीय वनअधिनीयम १९२७ चे कलम ४१(२)(ब) अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणी वनपाल चिपळूण, वनरक्षक कोळकेवाडी पुढील तपास करीत आहेत.
ही कारवाई विभागीय वनाधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक (प्रा) रत्नागिरी (चिपळूण), वैभव बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती राजेश्री किर - वृक्ष अधिकारी, दौ.रा.भोसले, वनपाल चिपळूण, राहूल गुंढे कोळकेवाडी यांनी केली.