युवा एकता सामाजिक संस्थाने उपसले उपोषणाचे हत्यार

संगमेश्वर/लोकनिर्माण (धनंजय भांगे)

 संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे सोनगीरी ग्रामपंचायत, मुचरी ग्रामपंचायत व मौजे असुर्डे ग्रामपंचायत या गावातील ग्रामपंचायती मध्ये झालेल्या गैव्यवहारप्रकरणी देवरूख संगमेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. भरतजी चौघुले , विस्तार अधिकारी गिरी व घुले यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती परंतु त्यांनी अद्याप तक्रारीवर कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही.

गटविकास अधिकारी तक्रारीची दखल घेत नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली परंतु ते देखील तक्रारीची दखल घेण्यास टाळटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.

 विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने स्मरणपत्र काढून देखील कोणतीही कारवाई होत नाही यानुसार असे दिसून येत आहे की मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व तिन्ही ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंच, उपसरपंच,सदस्य व ग्रामसेवक यांचे एकमेकांशी साटेलोटे असल्याचे दिसून येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना विनंती केली आहे की शासकीय अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात यावे तसेच तिन्ही ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी लोकशाही असलेल्या या संघराज्याच्या नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी संस्थामार्फत केली जात आहे.

मागील एक वर्षापासून तिन्ही ग्रामपंचायत मधील नागरिक यासाठी शासन दरबारी पत्रव्यवहार करत असून त्यावर अद्याप कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे पुढील 15 दिवसात जिल्हा अधिकारी यांनी संबंधितावर कोणतीही कारवाई न केल्यास भारतीय घटनेचे शिल्पकार प.पू. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी 06 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11:०० वाजता* आपल्या दालनात तिन्ही ग्रामपंचायत च्या नागरिकांकडून बेमुदत आमरण उपोषणाची हाक देण्यात आली आहे.